
मुंबई, 03 जुलै (हिं.स.)। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गुरुवारी दुपारी सांताक्रूझ (पश्चिम) येथील रिलिफ रोड परिसरात घडलेल्या दुर्घटनेत आठ मजूर जखमी झाले. खासगी पुनर्विकास प्रकल्पाच्या जागेवर अचानक मोठे झाड कोसळल्याने ही घटना घडली. जखमींना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकल्पाच्या परिसरात यापूर्वीही एक झाड कोसळले होते. या घटनेची पाहणी करण्यासाठी स्थानिक नगरसेविका हेतल गाला यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे पथक घटनास्थळी आले होते. पाहणी सुरू असतानाच परिसरातील आणखी एक मोठे झाड अचानक उन्मळून पडले. त्यावेळी तेथे काम करत असलेले मजूर झाडाखाली अडकले. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि बचाव कर्मचारी यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. झाडाखाली अडकलेल्या सर्व मजुरांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नूर आलम (२६), राजेश कुडल (५१), विनय कदम (३८), सुलेमान शेख (२८), विनोद भट (४६), देवाश साह (२८), जगदीश निकम (२८) आणि निलाद तुळ्हे (६७) अशी जखमींची नावे आहेत. सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांसाठी मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून जोरदार वाऱ्यामुळे झाडे किंवा फांद्या कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच जुन्या झाडांजवळ, जीर्ण इमारतींच्या परिसरात आणि पाणी साचणाऱ्या भागात विशेष खबरदारी घेण्याचेही प्रशासनाने नागरिकांना सुचवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule