श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अतिक्रमणावर मनपाचा निर्णायक पवित्रा; सीमांकनानंतर हटाव कारवाई
अमरावती, ३ जुलै (हिं.स.) : मौजा जेवड येथील सर्व्हे क्रमांक २७/२ मधील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या शासकीय जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. संबंधित अतिक्रमणधारकांना यापूर्वी जागा रिकामी करण्याच्या स
श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अनधिकृत अतिक्रमणावर महानगरपालिकेचा कारवाईचा इशारा;


अमरावती, ३ जुलै (हिं.स.) : मौजा जेवड येथील सर्व्हे क्रमांक २७/२ मधील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या शासकीय जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. संबंधित अतिक्रमणधारकांना यापूर्वी जागा रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने वरिष्ठ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाईला गती देण्याचे निर्देश दिले.

महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, नगरसेविका सुमती ढोके, नगरसेवक संजय गव्हाणे, मंगेश खोंडे तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

संयुक्त पाहणीदरम्यान अतिक्रमित जागेची सद्यस्थिती, बांधकामाचे स्वरूप आणि मालकीसंदर्भातील उपलब्ध अभिलेखांची तपासणी करण्यात आली. तसेच महसूल आणि अभियांत्रिकी विभागाला जागेचे अचूक मोजमाप व सीमांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सीमांकनाचा अहवाल प्राप्त होताच नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वी संबंधितांना स्वखर्चाने अतिक्रमण हटविण्याची संधी दिली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाला प्रत्यक्ष कारवाईची प्रक्रिया सुरू करावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासकीय आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला.

श्रीकृष्ण मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मंदिरालगत झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करून नागरिकांना सुरक्षित आणि मोकळी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे.

सीमांकन आणि मोजमापाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार असून, शहरातील इतर शासकीय व सार्वजनिक जागांवरील अनधिकृत अतिक्रमणांवरही याच धर्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande