अमरावतीतील 'फ्यूल हेडक्वार्टर' हॉटेलला रहस्यमय आग, 20 लाखांच्या नुकसानीची शक्यता
अमरावती, 03 जुलै (हिं.स.)। शहरातील वर्दळीच्या बियाणी चौक परिसरातील ''फ्यूल हेडक्वार्टर'' हॉटेलला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी आग लागण्यामागील कारणांबाबत संशय
अमरावतीतील 'फ्यूल हेडक्वार्टर' हॉटेलला रहस्यमय आग


अमरावती, 03 जुलै (हिं.स.)।

शहरातील वर्दळीच्या बियाणी चौक परिसरातील 'फ्यूल हेडक्वार्टर' हॉटेलला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी आग लागण्यामागील कारणांबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू केला आहे.शुक्रवारी सकाळी सुमारे ११.४० वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक पंधरे, केंद्रप्रमुख सोनकांबळे आणि पाली प्रमुख मनोज इंगोले यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे ५० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.प्राथमिक माहितीनुसार, हॉटेल मालकाने सुमारे २० लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान, आग शॉर्टसर्किटमुळे लागली की त्यामागे अन्य काही कारण अथवा घातपात आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच हॉटेलमध्ये अग्निसुरक्षेचे सर्व नियम आणि मानकांचे पालन करण्यात आले होते का, याचीही चौकशी केली जात आहे.या बचावकार्यामध्ये मनोहर राठोड, शेख तोशिफ, कासम खान, नरेंद्र कोकणे, राजू शेंडे, हर्षद दहातोंडे, विशाल भगत, मोहन वानखडे, मोहम्मद ताहिर, राहुल घोडे, प्रशांत गोडे आणि जयकुमार वानखडे यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पोलिस सध्या हॉटेल व्यवस्थापनाची चौकशी करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू आहे. मानवी निष्काळजीपणा किंवा आपराधिक कारणामुळे आग लागल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande