
अमरावती, 03 जुलै (हिं.स.) | राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अमरावती दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. या जनसुनावणीत पूर्वनोंदणी केलेल्या तक्रारींसह थेट उपस्थित राहून महिलांनी मांडलेल्या तक्रारीही स्वीकारण्यात आल्या. त्यामुळे महिलांना आयोगासमोर प्रत्यक्ष आपली बाजू मांडण्याची आणि समस्यांचे सविस्तर निवेदन करण्याची संधी मिळाली.
जनसुनावणीदरम्यान आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांच्या तक्रारी समोरासमोर ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. एकूण ८१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २६ प्रकरणांचे त्याच दिवशी निराकरण करण्यात आले. उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. या तक्रारींमध्ये प्रामुख्याने कौटुंबिक वाद, पती-पत्नीतील मतभेद, संपत्तीचे वाद तसेच महिलांवरील अन्यायाशी संबंधित प्रकरणांचा समावेश होता. काही गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांना चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
यावेळी विजया रहाटकर यांनी महिलांना न्याय मिळवून देणे हे राष्ट्रीय महिला आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांना थेट आयोगापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली असून अनेक महिलांना तातडीने दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संबंधित यंत्रणांनी महिलांच्या तक्रारींवर संवेदनशीलतेने आणि वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी