
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हि.स.) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण कार्यालय आजपासून अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आले. या कार्यालयाचे पहिले मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गिते यांनी पदभार स्वीकारत कामकाजास सुरुवात केली.
मृद व जलसंधारण आयुक्त प्रतिभा इंगळे, ‘वाल्मी’चे महासंचालक सुनील कुशिरे, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज, वाल्मीचे सहसंचालक सुभाष कापगाते, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके तसेच जलसंधारण महामंडळाचे मुख्य लेखा परीक्षक गणेश पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
गेल्या 27 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार मृद व जलसंधारण विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंता कार्यालयाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील 8 आणि नाशिक प्रादेशिक विभागातील 5 असे एकूण 13 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.या नवीन कार्यालयाच्या स्थापनेमुळे मृद व जलसंधारणाशी संबंधित कामकाज अधिक सुसूत्र व प्रभावीपणे पार पाडले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हे कार्यालय वाल्मी परिसर, कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis