
लातूर, 03 जुलै (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील घोणशी गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या थ्रीफेस वीज योजनेचा वापर राज कन्स्ट्रक्शन कंपनीकडून होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणामुळे गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रश्नाकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका तरुणाने थेट विद्युत खांबावर चढून अनोखे आंदोलन केले.
आंदोलन करणाऱ्या तरुणाने गावकऱ्यांसाठी असलेल्या थ्रीफेस योजनेचा कंपनीने वापर करीत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे,असा आरोप केला. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचेही त्याने सांगितले.
या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा देत संबंधित विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून घोणशी गावाला अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि वीज वितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकाची समजूत काढून सुरक्षितपणे खाली उतरवले. याप्रकरणी प्रशासनाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis