मोहोळ पंढरपूरला जोडण्याच्या निर्णयाविरोधात एल्गार; हरकती दाखल करण्याचे आवाहन
सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)। पंढरपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे. या मुद्द्यावर भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांन
evm


सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)।

पंढरपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे. या मुद्द्यावर भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, ग्रामपंचायती आणि विविध सहकारी संस्थांनी या निर्णयाविरोधात ठराव मंजूर करून हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शासनाने पंढरपूर येथील नव्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात माळशिरस, माढा, सांगोला, करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ या तालुक्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, मोहोळ वगळता इतर तालुक्यांसाठी हा निर्णय तुलनेने सोयीचा असला, तरी मोहोळ तालुक्यासाठी तो गैरसोयीचा असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

मोहोळ तालुक्याचे दैनंदिन प्रशासकीय व्यवहार, आरोग्य सेवा, शिक्षण, व्यापारी व्यवहार तसेच शेतमालाची खरेदी-विक्री यांचा केंद्रबिंदू सोलापूर असल्याने पंढरपूरशी प्रशासकीय जोडणी नागरिकांसाठी अडचणीची ठरेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील काही मोजकी गावे वगळता बहुतांश गावांतील नागरिकांना पंढरपूरला ये-जा करणेही गैरसोयीचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध सहकारी संस्था आणि सामाजिक संघटनांनी या निर्णयाविरोधात ठराव मंजूर करून शासनाकडे हरकती दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या विषयात राजकारण न आणता सर्वांनी एकत्र येऊन विरोधाचे ठराव मंजूर करावेत, असे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.

दरम्यान, या प्रस्तावासंदर्भात हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ९ जुलै असून, जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाकडे आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. या मुद्द्यावर पुढील काही दिवसांत आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande