पंढरपूर वारीसाठी एसटीच्या 5,500 विशेष बस धावणार
रायगड, 03 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणत्याही गावातून किमान 40 किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास, त्यांच्या
Priority for Warkaris' convenience; 5,500 special ST buses to operate.


रायगड, 03 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणत्याही गावातून किमान 40 किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास, त्यांच्या गावातूनच थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यंदाच्या वारीसाठी तब्बल 5,500 विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचाही लाभ वारकऱ्यांना मिळणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

वारीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार असून तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, आपत्कालीन आरोग्य सुविधा, माहिती केंद्रे आणि दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकही तैनात राहणार आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधला असून वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक 24 तास कार्यरत राहणार आहेत. प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी भाविकांनी आगाऊ आरक्षण करावे तसेच विशेष बसची आवश्यकता असल्यास आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande