छ. संभाजीनगरमध्ये १६३२ कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर; १.८ लाख शेतकरी लाभार्थी पात्र
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 लाख 80 हजार 176 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, एकूण 1632 कोटी 12 लाख रुपयांचे
छ. संभाजीनगरमध्ये १६३२ कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर; १.८ लाख शेतकरी लाभार्थी पात्र


छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै (हिं.स.) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 लाख 80 हजार 176 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, एकूण 1632 कोटी 12 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली.

या योजनेतील काही शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण अद्याप प्रलंबित असून, एकूण 712 खातेदारांचे आधार बँक खात्याशी जोडले गेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून आधार संलग्नीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, सहकारी आणि ग्रामीण बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, बँकनिहाय आकडेवारीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्थांतील सर्वाधिक लाभार्थी आहेत.

योजनेनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच पुनर्गठित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पूर्वीच्या 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या नव्या योजनेत कमाल 50 हजार रुपयांपर्यंतच लाभ मिळणार आहे. तसेच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून उर्वरित रक्कम अदा केली जाणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. योजना पोर्टलवर सर्व आकडेवारी अपलोड करण्यात आल्याची माहितीही बँक प्रशासनाने दिली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande