रेणापूर पोलिसांची दमदार कामगिरी; तीन चोरीचे गुन्हे उघड
लातूर, 03 जुलै (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रेणापूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन पाणबुडी मोटारी, एक इलेक्ट
पोलीस कारवाई


लातूर, 03 जुलै (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रेणापूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन पाणबुडी मोटारी, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक मोटारसायकल असा एकूण सुमारे ७१ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

रेणापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)) च्या तपासादरम्यान पवन लक्ष्मण शेनोरे (वय २२, रा. मळवटी रोड, लातूर) आणि राजू शिवराम शेनोरे (वय ३५, मूळ रा. विद्या कॉलनी, बिदर, कर्नाटक, सध्या रा. मळवटी रोड, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत दोघांनी महापूर येथून चोरी केलेल्या दोन पाणबुडी मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोटारींचे वेगवेगळे भाग करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींकडून मोटारींचे सर्व भाग जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे १६ हजार रुपये आहे.

पुढील चौकशीत या दोघांकडून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ मधील सांगवी (ता. रेणापूर) येथून चोरीस गेलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटारही हस्तगत करण्यात आली. त्यामुळे चोरीच्या आणखी एका गुन्ह्याची यशस्वी उकल झाली.

दरम्यान, गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२७/२०२६ च्या तपासात लक्ष्मण चंदर शेनोरे (वय ४८, रा. मळवटी रोड, लातूर) याला अटक करण्यात आली. त्याने एका फरार साथीदाराच्या मदतीने सोमठाणा (ता. रेणापूर) येथील निवाडा फाटा परिसरातून चोरी केलेली सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

या सलग कारवाईमुळे तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून दोन पाणबुडी मोटारी, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक मोटारसायकल असा एकूण सुमारे ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखालील रेणापूर पोलीस पथकाने केलेल्या या प्रभावी तपासामुळे चोरीच्या गुन्ह्यांचा जलद छडा लागला असून मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande