एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य
सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ''लाडकी बहीण'' योजनेतील महिलांसह सर्व
NMC ST Card


सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'लाडकी बहीण' योजनेतील महिलांसह सर्व सवलतधारक प्रवाशांनी पुढील २८ दिवसांत स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक असून, १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्डशिवाय सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही.

एसटीचा प्रवास अधिक स्मार्ट, डिजिटल आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीएमसी कार्डमुळे तिकीट वितरणाची प्रक्रिया जलद होणार असून, रोख व्यवहारातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महामंडळाने कार्ड नोंदणी प्रक्रिया सुलभ केली असून, अर्ज केल्यानंतर सुमारे ३० दिवसांत लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर कार्ड ऑनलाइन रिचार्ज करून वापरता येणार असल्याने प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.

महामंडळाच्या माहितीनुसार, सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २ लाख ८९ हजार ३७१ प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध सवलत योजनांतील लाभार्थ्यांना या डिजिटल प्रणालीचा लाभ मिळणार आहे.

परिवहन महामंडळ, ट्रॅव्हिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत असून, कॅशलेस आणि स्मार्ट प्रवासाच्या दिशेने एसटी महामंडळाचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande