
लातूर, 03 जुलै (हिं.स.)। शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील रजिस्ट्री कार्यालय परिसरात अनेक वर्षांपासून असलेले संपूर्ण अतिक्रमण महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईत हटविण्यात आले. या धडक मोहिमेमुळे परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
कारवाईनंतर तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले की, महसूल विभाग, पोलिस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबविण्यात आली. अनेक वर्षांपासून या परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला होता. तो आता पूर्णपणे दूर करण्यात आला आहे. यापुढे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही. कोणीही पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
या कारवाई दरम्यान तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह महानगरपालिकेचे अतिक्रमण प्रमुख समाधान सूर्यवंशी, पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला रजिस्ट्री कार्यालय परिसर अखेर अतिक्रमणमुक्त झाला असून, शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis