
लातूर, 03 जुलै, (हिं.स.)। लातूर-उदगीर महामार्गावरील अजणसोंडा पाटीजवळ शुक्रवारी कार, ऑटो आणि मोटारसायकल यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीरहून लातूरच्या दिशेने येत असताना कार, ऑटो आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात प्रद्यूम्न माचवे (वय ३५, रा. नळेगाव), कावेरी माचवे (वय ३०, रा. नळेगाव) आणि गोपाळ माने (वय ३५, रा. उदगीर) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis