
रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात आज ट्रेलरचा पघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रेलरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरदार आदळला. ट्रेलरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक मैदाड, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित घुले, एएसआय तळेकर तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळित ठेवत बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, चालकाला ट्रेलरच्या केबिनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रत्नागिरी एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून चालकाची सुखरूप सुटका केली.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी