
लातूर, 03 जुलै (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रस्तावावरून वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५६(१)(ब) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी अक्षय राजू कोंद्रे ऊर्फ जाधव (वय २४, रा. वैभव नगर, सध्या रा. राजे शिवाजी नगर, लातूर) आणि करण पांडुरंग पवार (वय २४, रा. आयोध्या नगरी, भांबरी चौक, लातूर) यांच्याविरुद्ध हद्दपारीचे आदेश पारित केले.
चौकशीदरम्यान या दोघांविरुद्ध एमआयडीसी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांत खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, दंगल, धमकी, सार्वजनिक शांततेचा भंग, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचा कोणताही परिणाम न होता त्यांनी गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. तसेच त्यांच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास किंवा न्यायालयात साक्ष देण्यास धजावत नसल्याचेही गोपनीय चौकशीत स्पष्ट झाले.
हद्दपारीच्या आदेशानुसार या दोघांना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुके तसेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका या क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे.
आदेशानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याने तातडीने कारवाई करून दोन्ही आरोपींना निर्धारित क्षेत्राबाहेर काढले. पोलीस अंमलदार बी. आर. भोसले यांनी त्यांना नियमानुसार बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यात हजर केले. हद्दपारीच्या कालावधीत ते केज येथे वास्तव्यास राहणार असून त्यांच्या हालचालींवर संबंधित पोलीस ठाण्याकडून नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना हद्दपार क्षेत्रात प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून गेल्या काही महिन्यांपासून सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाया, अवैध धंद्यांवरील धाडसत्रे आणि विविध कायदेशीर कारवाया सातत्याने सुरू असल्याचेही या निमित्ताने सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis