
नंदुरबार, , 03 जुलै (हिं.स.) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या राज्यातील
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती, व प्रशिक्षण
प्रबोधिनी' (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या
पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
पात्र उमेदवारांनी 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक
योगेश अहिरे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत यूपीएससी पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण झालेल्या आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या
उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी 50 हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाईल. तसेच, जे उमेदवार
मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरतील, त्यांना मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी 25 हजार
रुपये इतके प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह 'अमृत'च्या लक्षित गटामधील उमेदवारांचा समावेश
आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित,
पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार,
लोहाणा, कानबी आदी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
'अमृत' संस्थेचे मुख्यालय औंध (पुणे) येथे असून राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये याची कार्यालये कार्यरत आहेत.
संस्थेचा कारभार पूर्णतः पारदर्शक व पेपरलेस असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालते. इच्छुक उमेदवारांनी
www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी
संकेतस्थळावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै
2026 आहे. योजनेसंदर्भातील सर्व पुढील सूचना केवळ संकेतस्थळावरच प्रसिद्ध केल्या जातील.
अधिक माहितीसाठी किंवा ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास जिल्हा अमृत कार्यालय,
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय (नगरपालिका विभाग) येथे किंवा जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे (मो.
क्र. 9112228771) यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापक श्री. अहिरे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर