
छत्रपती संभाजीनगर, 03 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२६ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेची व मुलाखतीची पूर्वतयारी करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना (सन २०२६-२७) राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ अमृतच्या लक्षित गटातील ब्राह्मण,कायस्थ,कोमटी, मारवाडी,पाटील,राजपूत,यलमार, अय्यंगार,राजपुरोहित,पाटीदार, वैश्य,नायर,नायडू,कम्मा,बनिया, बंगाली,त्यागी,सेनगुंथर,गुजराती, जाट,हिंदू नेपाळी,भूमिहार, लोहारणा,कानबी आदी समाजघटकांतील पात्र उमेदवारांना मिळणार आहे.
सन २०२६-२७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२६ उत्तीर्ण झालेल्या आणि या आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक उमेदवारांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा.अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपये तर मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
योजनेसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना व माहिती केवळ अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून,ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत अथवा योजनेसंदर्भात कोणतीही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ जुलै २०२६ असून,पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis