
नाशिक, 03 जुलै (हिं.स.)। 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून, यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या रूपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असलेले पात्र साकारत असल्याची चर्चा आहे.
यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, की हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असेल, तर त्याच्यावर सिनेमा बनविता येत नाही. सिनेमा बनवला, तरी जिवंत व्यक्तीवर आधारित चित्रपट किंवा पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची लेखी परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक असते. या चित्रपटासाठी माझी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपट निर्माते आणि संबंधित कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठविली जाईल, असा इशारा चाकरणकरांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, की खरात प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वाट्टेल तसे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. माझी मुले सध्या शैक्षणिक क्षेत्रात करिअर करीत आहेत, असे असतानाही त्यांना नाहक टार्गेट करण्यात आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. रूपाली चाकणकर यांनी केवळ चित्रपट निर्मात्यांवरच नाही, तर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणाऱ्यांवरही कायदेशीर बडगा उगारला आहे. त्यांनी सांगितले, की पुराव्याशिवाय चिखलफेक करणाऱ्या आशा मिरगे, रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यासह काही यूट्यूब चॅनल्सनाही नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या दि. १० जुलै रोजी मी स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी हजर राहणार आहे. स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी हा कायदेशीर लढा मी शेवटपर्यंत लढणार आहे, असे रूपाली चाकणकर यांनी ठामपणे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV