खोपोलीत कार नुकसान वादातून महिलेचे अपहरण
रायगड, 03 जुलै (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेडवली-लौजी परिसरात कारच्या नुकसानीच्या वादातून एका महिलेला व तिच्या साक्षीदाराला जबरदस्तीने कारमध्ये बसवून 1.70 लाख रुपयांची मागणी करत मारहाण व दमदाटी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
Woman kidnapped over car damage costs; assaulted while a ransom of ₹1.70 lakh was demanded.

रायगड, 03 जुलै (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेडवली-लौजी परिसरात कारच्या नुकसानीच्या वादातून एका महिलेला व तिच्या साक्षीदाराला जबरदस्तीने कारमध्ये बसवून 1.70 लाख रुपयांची मागणी करत मारहाण व दमदाटी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडवली-लौजी येथील मालव वेलेसिंया इमारतीतील रहिवासी असलेल्या महिला फिर्यादी यांच्या घरी शिळफाटा, खोपोली येथील आरोपी आले. कारच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून पैसे मागण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद आणि शिवीगाळ झाली. यानंतर आरोपींनी संगनमताने फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या साक्षीदाराला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यांचे मोबाईल फोन काढून घेत कारच्या नुकसानीपोटी ₹1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत शिवीगाळ केली तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 239/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 140(3), 127(7), 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एडवळे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande