सोलापूर जिल्हा परिषदेत सीईओंच्या कामकाजावर नाराजी; बदलीच्या मागणीची चर्चा
सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कामकाजाबाबत सत्ताधारी पदाधिकारी आणि काही सदस्यांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. आगामी सर्वसाधारण सभेत त्यांच्या बदलीची मागणी करणारा
ZP CEO


सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कामकाजाबाबत सत्ताधारी पदाधिकारी आणि काही सदस्यांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. आगामी सर्वसाधारण सभेत त्यांच्या बदलीची मागणी करणारा विषय काही सदस्यांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत निर्णय किंवा ठराव अद्याप झालेला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, कुशल जैन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विकासकामांना अपेक्षित गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक प्रस्ताव आणि विकासकामांच्या मंजुरीला विलंब होत असल्याची तक्रार काही सदस्यांकडून केली जात आहे. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतरही विकासकामे अपेक्षित वेगाने होत नसल्याने सत्ताधारी सदस्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची मागणी काही सदस्यांकडून होत आहे. तसेच, अध्यक्ष दीपक वैद्य यांनी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असून, या विषयाची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेतील काही पत्रकारांमध्येही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमांशी असलेल्या संवादाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी नियमित पत्रकार परिषद किंवा अनौपचारिक संवादातून माहिती देत असत. मात्र, सध्याच्या कार्यपद्धतीनुसार पत्रकारांनी प्रश्न लेखी स्वरूपात सादर करावेत, त्यानंतरच माहिती दिली जाईल, अशी भूमिका कार्यालयाकडून घेतली जात असल्याची चर्चा आहे.

मात्र, या सर्व घडामोडींवर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तसेच, त्यांच्या बदलीबाबत शासनाकडूनही कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande