
* हाफकिनला १५० कोटींचा निधी द्यावा
मुंबई, ३ जुलै (हिं.स.) : विधानसभेत हाफकिन संस्थेच्याबाबत प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला थेट सवाल करत हाफकिन संस्थेच्या खासगीकरणाच्या हालचालींवर तीव्र आक्षेप नोंदवला.
वडेट्टीवार म्हणाले की, हाफकिन संस्थेच्या खासगीकरणाचा विषय यापूर्वीही चर्चेला आला होता. सुरुवातीला सरकारने संस्थेची एक इंचही जमीन दिली नसल्याचा दावा केला होता. मात्र नंतर टाटा समूहाला संशोधन केंद्रासाठी पाच एकर जमीन कराराद्वारे दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरकारच्या वक्तव्यांमध्ये विसंगती असून याबाबत पारदर्शकता आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, हाफकिनला आवश्यक असलेल्या त्रिवेणी लस निर्मितीसाठी आणि अद्ययावत यंत्रसामग्रीसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची गरज असल्याचे सरकार सांगते. एवढ्या मर्यादित गुंतवणुकीमुळे संस्था सक्षम होऊ शकत असताना, हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेवर खासगी कंपन्यांची नजर का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर खासगी हितसंबंध निर्माण होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली.
हाफकिनसारखी ऐतिहासिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था खासगीकरणाच्या मार्गावर नेली जाणार नाही, याची स्पष्ट हमी सरकारने सभागृहात द्यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी हाफकिन संस्थेचे खासगीकरण केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी आणि आमदारांची बैठक बोलावून संस्थेच्या बळकटीकरणासाठी मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी