चंद्रपूर : रानटी हत्तीच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
चंद्रपूर, 03 जुलै (हिं.स.)। चंद्रपूर- व्याहाड–सोनापूर मार्गावर एका रानटी हत्तीने दुचाकीस्वारांवर केलेल्या थरारक हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतुल गोहने असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण सावली त
चंद्रपूर हल्लेखोर रानटी हत्ती


चंद्रपूर, 03 जुलै (हिं.स.)। चंद्रपूर- व्याहाड–सोनापूर मार्गावर एका रानटी हत्तीने दुचाकीस्वारांवर केलेल्या थरारक हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतुल गोहने असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण सावली तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अतुल गोहने हे आपल्या दुचाकीने व्याहाडकडून सोनापूर मार्गे जात होते. दरम्यान, रस्त्यावरील एका वळणावर अचानक एक हत्ती त्यांच्या समोर आला. हत्तीने आक्रमक पवित्रा घेताच, प्रसंगावधान राखून त्यांनी आपली दुचाकी जागच्या जागीच पाडली आणि जीवाची पर्वा न करता रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र, संतापलेल्या हत्तीने त्यांचा पाठलाग सुरू केला. दुर्दैवाने, धावत असताना अतुल गोहने हे हत्तीच्या तावडीत सापडले. हत्तीने त्यांच्यावर अत्यंत भीषण आणि थरारक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे अतुल यांचा जागीच मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात हत्तींचा वावर वाढला असून वन्यजीवांच्या या हैदोसामुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस पथक दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांना जंगलातील रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande