रत्नागिरी : आंबा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू
रत्नागिरी, 3 जुलै, (हिं.स.) । अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज सकाळी मोठी दरड कोसळली. त्यामुळे घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे. आंबा घाटात मोठी दरड कोसळल्याने महामार्ग
आंबा घाटात कोसळलेली दरड


रत्नागिरी, 3 जुलै, (हिं.स.) । अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज सकाळी मोठी दरड कोसळली. त्यामुळे घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.

आंबा घाटात मोठी दरड कोसळल्याने महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील दख्खन ते कळकदरा या टप्प्यात सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र दरड मोठी असल्याने ती नक्की कधीपर्यंत दूर होईल, याचा अंदाज मिळू शकलेला नाही.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात काल दरड कोसळली होती. पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी डोंगराचा भाग कापण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाने मातीचा भराव रस्त्यावर येण्याचे प्रकार घडत आहेत. म्हणून जिल्ह्यातील सर्वच घाट परिसरांमध्ये, तसेच महामार्गावरही चालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुहागर तालुक्यात अति पावसामुळे झाडे पडून घर आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या दोन-तीन घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आज सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस मंडणगडमध्ये पडला. खेड आणि लांज्यात प्रत्येकी ७४ मिलिमीटर, दापोलीत ७०, संगमेश्वरात ६५, चिपळूण आणि राजापुरात प्रत्येकी ५६, रत्नागिरीत ४२, तर गुहागरमध्ये ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज दुपारी दोनच्या स्थितीनुसार, खेड तालुक्यातील जगबुडी नदीने भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. इशारा पातळी पाच मीटर असून, सध्या पाणीपातळी ५.३० मीटर आहे. धोका पातळी सात मीटर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande