सोलापूर मनपाच्या सहायक अभियंत्यावर खासगी ठेकेदारीचा आरोप; चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती
सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)। महापालिकेत सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या श्याम कन्ना यांच्यावर शासकीय सेवेत असतानाच खासगी बांधकामाची ठेकेदारी केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्रिस्तरीय चौकशी समि
smc


सोलापूर, 03 जुलै (हिं.स.)। महापालिकेत सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या श्याम कन्ना यांच्यावर शासकीय सेवेत असतानाच खासगी बांधकामाची ठेकेदारी केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. प्राथमिक पडताळणीत तक्रारीतील बाबींमध्ये तथ्य आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारीनुसार, कुमठा नाका परिसरातील मार्कंडेय नगर येथील नागनाथ कुंटोजी यांच्या बांधकामासाठी श्याम कन्ना यांनी सुमारे ६० लाख रुपयांचा खासगी ठेका स्वीकारला. तसेच, मी महापालिकेचा अधिकारी असल्याने तुमच्या बांधकामाला कोणताही अडथळा येऊ देणार नाही, असे सांगून ठेका घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ठरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने स्वीकारल्यानंतर कन्ना यांनी आणखी २१ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास बांधकामातील त्रुटी दाखवून महापालिकेमार्फत नोटीस पाठविण्याचा दबाव टाकत पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणासंदर्भात तक्रारदाराने आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे तसेच व्हॉट्सॲप चॅटचे पुरावे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केले आहेत. त्यानंतर आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली असून, समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बाजू अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande