बोराळे गाव दारूमुक्त करण्यासाठी महिलांचा एल्गार
अवैध दारूविक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सोलापूर, 03 जुलै: मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावात अवैध दारूविक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत दारूमुक्त गावासाठी जनजागृती रॅली काढली. या आंदोलनात भाजपच्या पंचाय
gfd


अवैध दारूविक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सोलापूर, 03 जुलै: मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावात अवैध दारूविक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत दारूमुक्त गावासाठी जनजागृती रॅली काढली. या आंदोलनात भाजपच्या पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांनी सहभागी होत प्रशासनाला आठ दिवसांत ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला.

महिलांनी गावातून फलकांसह रॅली काढत अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना निवेदन देऊन गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

रॅलीदरम्यान अनेक महिलांनी दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांचे होत असलेले नुकसान मांडले. काही महिलांनी आपल्या कुटुंबातील पुरुषांचा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाल्याचा दावा करत गावातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले.

गावात पोलीस आऊटपोस्ट असूनही सहापेक्षा अधिक ठिकाणी अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच शाळेजवळच दारूची विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही महिलांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी जयश्री कवचाळे यांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देत अवैध दारूविक्री आणि इतर बेकायदेशीर धंदे तातडीने बंद करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास महिला थेट अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी जाऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

महिलांच्या या आंदोलनानंतर बोराळे गावातील अवैध दारूविक्रीविरोधात पोलिस आणि संबंधित यंत्रणा कोणती कारवाई करतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande