पुण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार; शिवसेना नेत्यासह दोघे अटकेत
पुणे, 03 जुलै (हिं.स.) : बावधन परिसरातील सुस-नांदे रोडवरील एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून निर्माण झालेला तणाव मध्यरात्री गोळीबारापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखा
पुण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार; शिवसेना नेत्यासह दोघे अटकेत


पुणे, 03 जुलै (हिं.स.) : बावधन परिसरातील सुस-नांदे रोडवरील एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून निर्माण झालेला तणाव मध्यरात्री गोळीबारापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखासह दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काही जणांमध्ये जमिनीच्या व्यवहार आणि मालकी हक्कावरून चर्चा सुरू होती. सुरुवातीला हा वाद शाब्दिक बाचाबाचीपर्यंत मर्यादित होता, मात्र काही वेळातच तो चिघळून हाणामारीत रूपांतरित झाला. याचदरम्यान एका आरोपीने पिस्तूलातून गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली असून, जप्त केलेल्या शस्त्राच्या परवाना आणि वापराबाबत तपास सुरू आहे.

प्राथमिक तपासात हा वाद जमिनीच्या मालकी हक्क आणि आर्थिक व्यवहारांवरून निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित बांधकाम प्रकल्पावरून दोन्ही गटांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद असल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, गोळीबार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि फॉरेन्सिक तपास यांच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande