सोलापूर जि. परिषद शाळा टिकवण्यासाठी इंदुरीकर महाराज करणार जनजागृती
सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : गोरगरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती करण्याची गरज असून, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू
ZP news solpaur


सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : गोरगरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती करण्याची गरज असून, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती देशमुख (इंदुरीकर महाराज) यांनी दिली.

सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे येथे शिक्षक अशोक गंगाधरे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कीर्तनानंतर शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या अनौपचारिक संवादात ते बोलत होते. यावेळी शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष अमोघसिद्ध कोळी, प्रसाद कुलकर्णी आणि शांताराम गाजरे उपस्थित होते.

शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा बंद होण्याचे वाढते प्रमाण, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता ताण, रिक्त पदांचा प्रश्न तसेच टीईटी परीक्षेसंदर्भातील विविध मुद्दे इंदुरीकर महाराजांसमोर मांडण्यात आले. या विषयांवर समाजात योग्य जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद करत, आपल्या कीर्तनातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आश्वासन दिले.

यावेळी इंदुरीकर महाराज यांनी शिक्षकांवर लादण्यात आलेल्या टीईटी परीक्षेबाबतही नाराजी व्यक्त केली. शिक्षकांचे अध्यापन कौशल्य, दीर्घ अनुभव आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रत्यक्ष कार्याचे मूल्यमापन अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक समितीच्या या पुढाकारामुळे जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व, शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande