
रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । जिल्हा रुग्णालय आणि वालावलकर हॉस्पिटलतर्फे आयोजित 'सॅम-मॅम' बालकांच्या विशेष आरोग्य शिबिरात ७६ बालकांची तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पाली ग्रामीण रुग्णालयात 'सॅम' (तीव्र कुपोषित) आणि 'मॅम' (मध्यम तीव्र कुपोषित) बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिर पार पडले. जिल्हा रुग्णालय आणि वालावलकर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने तसेच आरबीएसके विभाग (ग्रामीण रुग्णालय, पाली) यांच्या समन्वयाने हे शिबिर झाले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान ज्या बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळली होती, त्यांच्यावर विशेष उपचार करण्यासाठी हे शिबिर होते. शिबिराचा ७६ बालकांनी लाभ घेतला.
तपासणीअंती बालकांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे: ७ बालके: तीव्र कुपोषित (सॅम), ६७ बालके: मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) २ बालके: इतर किरकोळ आजारांनी ग्रस्त
शिबिरात वालावलकर हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक गोडसे यांनी बालकांची सखोल वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार मोफत औषध वाटप केले. याशिवाय कुपोषण मुक्तीसाठी वालावलकर हॉस्पिटलतर्फे राबविल्या जाणाऱ्या 'लड्डू गोपाल' योजनेअंतर्गत शिबिरातील ५० बालकांना पौष्टीक लाडवांचे वाटप करण्यात आले.
केवळ उपचारच नव्हे, तर बालकांमधील कुपोषण पूर्णपणे दूर करण्यासाठी पालकांचे विशेष समुपदेशनही करण्यात आले. यामध्ये बालकांचा आहार कसा असावा, पालकांनी घरी कोणती काळजी घ्यावी आणि स्वच्छतेचे काय महत्त्व आहे, याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकांच्या समन्वयाने शिबिर पार पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी