
पुणे, 03 जुलै: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवार, 7 जुलै रोजी श्रीक्षेत्र देहू येथून होणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 11 ते 15 जुलैदरम्यान ग्रामीण भागात कडक बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे-सोलापूर मार्गासह विविध मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.
12 जुलै (लोणी काळभोर ते यवत मुक्काम):
पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला मार्गाने वळविण्यात येतील. सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली मार्गाचा वापर करतील.
13 जुलै (यवत ते वरवंड मुक्काम):
या दिवशी पुणे-सोलापूर वाहतूक हडपसर-मगरपट्टा-लोणीकंद-केसनंद-वाघोली-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ मार्गाने वळविण्यात येणार आहे. सोलापूरकडून येणारी वाहतूक याच मार्गाच्या उलट दिशेने वळविली जाईल.
14 जुलै (वरवंड ते उंडवडी मुक्काम):
या दिवशी चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल. बारामती-पाटस आणि बारामती-दौंड हे रस्ते दिवसभर बंद राहणार असून वाहने भिगवणमार्गे वळविण्यात येतील.
15 जुलै (उंडवडी ते बारामती मुक्काम):
बारामती-पाटस आणि बारामती-दौंड मार्ग पुन्हा बंद राहणार असून सर्व वाहतूक भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर वळविण्यात येईल.
पालखी सोहळ्यादरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु