
पुणे, 03 जुलै (हिं.स.)।
शहरातील वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी, शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती उद्यान समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
यासंदर्भात झालेल्या बैठकीत वृक्षारोपणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी संबंधित सर्व विभागांच्या नियमित बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत राहणार आहे.
या पथकांमार्फत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, धोकादायक वृक्षांची छाटणी, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच वृक्षांच्या देखभाल आणि निगा राखण्याची कामे करण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.
दरम्यान, वनमहोत्सव २०२६ अंतर्गत पुणे वनक्षेत्रात ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वन विभागाने निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक वृक्षारोपण आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही भिमाले यांनी दिली.
संयुक्त वन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिका आणि वन विभाग यांच्यात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्यातून विविध हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. संयुक्त वन व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या निधीतून शहरात वनीकरण आणि हरित संवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु