
सोलापूर, ३ जुलै (हिं.स.) : सोलापूर महापालिकेच्या हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार असल्याच्या चर्चेला जिल्हा परिषदेने पूर्णविराम दिला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी या हस्तांतरणाला स्पष्ट विरोध दर्शवत संबंधित शाळा जिल्हा परिषदेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ जिल्हा परिषद शाळा यू-डायस (UDISE) प्रणालीमध्ये जिल्हा परिषदेच्या लॉगिनवरून हटवून महानगरपालिकेच्या लॉगिनशी संलग्न झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, या शाळांच्या मालकी आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या भवितव्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
याबाबत स्पष्टीकरण देताना इंद्रजित पवार आणि चेतनसिंह केदार यांनी सांगितले की, महापालिका हद्दीतील शाळांची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने त्या तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिकेच्या यू-डायस प्रणालीशी जोडण्यात आल्या होत्या. हा केवळ तांत्रिक बदल असून शाळांच्या मालकी हक्क किंवा प्रशासकीय नियंत्रणाशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित शाळा पुन्हा जिल्हा परिषदेच्या यू-डायस लॉगिनवर दिसतील, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण होणार नसून, त्यांच्या विकासासाठी आवश्यक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्यास जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड