
रत्नागिरी, 4 जुलै, (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गेल्या शनिवारपर्यंतच्या (२७ जून) काळात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या अवघ्या आठ टक्के पाऊस पडला होता. तेथून आजपर्यंतच्या (४ जुलै) एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस पडला आहे.
हंगामात आतापर्यंत एकूण २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस पडला. सर्वाधिक १३८ मिलिमीटर पाऊस चिपळूणमध्ये, तर त्याखालोखाल १२५ मिलिमीटर पाऊस मंडणगडमध्ये झाला. खेडमध्ये ११३, दापोलीत १०२, लांज्यात ९६, राजापुरात ९२, संगमेश्वरात ८८, रत्नागिरीत ८६, तर गुहागरमध्ये ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या वरच आहे; मात्र आज पहाटे पाचच्या तुलनेत सायंकाळी चारपर्यंत ती ०.५० मीटरने घटली आहे. जिल्ह्यातल्या अन्य कोणत्याही नद्या इशारा पातळीच्या वर नाहीत; मात्र त्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची पातळी पहाटेइतकीच म्हणजे तीन मीटर आहे. संगमेश्वरातील शास्त्री (३ मीटरवरून ४.८० मीटरवर), सोनवी (२.६०वरून ४.२० मीटरवर), बावनदी (४.८३वरून ६.७३ मीटरवर), राजापूरमधील कोदवली (१.४०वरून ३.२० मीटरवर), लांज्यातील काजळी (१३.१०वरून १५.४० मीटरवर) आणि मुचकुंदी (०.४० मीटरवरून १.२० मीटरवर) या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ नोंदवली गेली आहे. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी