
अमरावती, 04 जुलै, (हिं.स.) शहरासह संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या अनेक दशकांपासून शिवप्रेमी आणि नागरिकांचे स्वप्न असलेल्या भव्य ‘शिवसृष्टी’ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या निर्मितीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. आमदार गजानन लवटे यांनी या ऐतिहासिक कामासाठी ९० लाख ६० हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करून मंजूर करून घेतला आहे. या नावीन्यपूर्ण कामाचे अधिकृत मंजुरी पत्र आमदार गजानन लवटे यांनी नगरसेवक सुयोग खाडे यांच्याकडे सुपूर्द केले.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पंचायत समितीच्या जागेवर ही भव्य शिवसृष्टी उभारली जाणार असून, त्यामुळे अंजनगावसुर्जीच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा राहावा, यासाठी शहर-तालुक्यातील सामाजिक संघटना, शिवप्रेमी व नागरिकांनी वर्षानुवर्षे मोर्चे, निवेदने आणि आंदोलनांच्या माध्यमातून प्रयत्न केले. मात्र, जागेची अडचण, तांत्रिक परवानग्या व निधीच्या कमतरतेमुळे हा विषय लांबत गेला. आमदार लवटे यांनी मात्र निवडणुकीतील शब्द पाळत दीड वर्षातच भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी