लातूर : पावसाळ्यात वीज अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महावितरणचे आवाहन
लातूर, 04 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजेमुळे महावितरणच्या वीजयंत्रणेला मोठा फटका बसत असून संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावि
महावितरणचे आवाहन


लातूर, 04 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजेमुळे महावितरणच्या वीजयंत्रणेला मोठा फटका बसत असून संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, पावसाळ्यात वीजतारा तुटणे, वीजखांब कोसळणे, रोहित्र पडणे तसेच करंट उतरण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. अशा तारांना हात लावू नये किंवा त्या स्वतः हटविण्याचा प्रयत्न करू नये. वीजवाहिनीवर झाडांच्या फांद्या पडल्यास त्या स्वतः काढण्याऐवजी तातडीने महावितरणला माहिती द्यावी.

घरातील वीजमीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर बसविलेली भिंत ओली झाल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा. विजेच्या खांबाला हात लावू नये. स्टे-वायरला गुरे-ढोरे बांधू नयेत तसेच कपडे वाळत घालण्यासाठी त्याचा वापर करू नये.

घरातील विद्युत यंत्रणा आणि अर्थिंगची तपासणी मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून करून घ्यावी. अपार्टमेंटमधील मीटर बॉक्स स्वच्छ ठेवावा. भिंतीत पाणी मुरणार नाही याची काळजी घ्यावी. स्विच बोर्डापासून मोटारीपर्यंत जाणाऱ्या वायरला अनधिकृत जोड देऊ नये. शॉर्टसर्किट झाल्यास तात्काळ मुख्य स्विच बंद करावा. दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर ठेवावा. ओल्या कपड्यांवर इस्त्री करू नये तसेच स्विच बोर्ड किंवा विद्युत उपकरणांवर पाणी पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. संभाव्य धोका टाळण्यासाठी काहीवेळा खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र किंवा फिडर बंद करून वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जातो. अशा परिस्थितीत नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तक्रारींसाठी संपर्क लातूर जिल्ह्याच्या ७८७५७६२०२१ या नियंत्रण कक्षाच्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधता येईल. या क्रमांकावर व्हॉट्सॲप सेवा उपलब्ध असून ग्राहकांना तक्रारींसह संबंधित छायाचित्रेही पाठविता येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande