
येवला, 04 जुलै (हिं.स.)। भारतीय जनता युवा मोर्चातर्फे महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेली 'युवाशक्ती जागर यात्रा' येवला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दाखल झाली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यात्रेची सुरुवात येथील विंचूर चौफुली परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या या जागर यात्रेदरम्यान विविध महापुरुषांच्या स्मारकांना व पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यामध्ये सेनापती तात्या टोपे, महाराणा प्रतापसिह , छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या कार्याला व योगदानाला अभिवादन करून त्यांची प्रेरणादायी परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला.
या यात्रेप्रसंगी कोटमगाव देवीचे येथे मोठया उत्साहात युवा मोर्चा शाखेचे उदघाटन करण्यात आले,जगदंबा मातेचे दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली, देवस्थानच्या वतीने कृष्णराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला, नागडे येथे सुद्धा मोठ्या दिमाखात शाखेचे उदघाटन करण्यात आले, वडगाव येथे युवकांना मार्गदर्शन व आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला, 'युवा शक्ती जागर यात्रा'च्या माध्यमातून राज्यातील युवकांना संघटित करणे, राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग वाढविणे आणि समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यात्रेदरम्यान युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित युवकांना संबोधित केले. त्यांनी युवकांना सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या प्रगतीत युवकांची भूमिका महत्त्वाची असून, युवा शक्तीला सकारात्मक दिशा देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. या जागा यात्रे प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष समीर समदडिया, प्रा,नानासाहेब लहरे,राजु परदेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV