राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी व्यासपीठ – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
चंद्रपूर, 04 जुलै (हिं.स.) :राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रप्रेम आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणारे प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, स्वच्छता
सरदार पटेल महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक नियोजन कार्यशाळा उत्साहात संपन्न


चंद्रपूर, 04 जुलै (हिं.स.) :राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रप्रेम आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणारे प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण यांसारखे उपक्रम सातत्याने राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येते, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय ‘प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी वार्षिक नियोजन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. बोकारे यांनी चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्तीच्या दिशेने राष्ट्रीय सेवा योजना विभागाने व्यापक जनजागृती अभियान राबवावे, असे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी NSS ही केवळ उपक्रमांची योजना नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि सेवाभाव निर्माण करणारी चळवळ असल्याचे सांगितले. तसेच विद्यापीठात स्वतंत्र NSS ‘ओपन युनिट’ सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

कार्यशाळेचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. गुरुदास बल्की यांनी केले.

पहिल्या सत्रात संजय रामगिरवार यांनी ‘चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मोहीम आणि वृक्षारोपण’ या विषयावर मार्गदर्शन करताना एनएसएस स्वयंसेवकांची पर्यावरण संवर्धनातील भूमिका स्पष्ट केली.

दुसऱ्या सत्रात डॉ. श्याम खंडारे, डॉ. गुरुदास बल्की आणि डॉ. प्रदीप चापले यांनी अनुदान वितरण, लेखापरीक्षण, स्वयंसेवक नोंदणी, विशेष शिबिरे, तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. आगामी शैक्षणिक वर्षातील उपक्रम, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि विद्यार्थी विकास यावरही सविस्तर चर्चा झाली.

कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएसएस कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम यांनी मानले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हनुमंत डंबारे, राजेश इंगोले, दर्शन मेश्राम, गौरव झाडे, शालिनी निर्मलकर यांच्यासह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

-------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande