
लातूर, 04 जुलै (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील जाणवळ येथे एप्रिल २०२६ मध्ये लागलेल्या भीषण आगीत ज्ञानोबा भोजने यांची जनावरे दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तत्काळ बाधित कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्या अनुषंगाने संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून भोजने कुटुंबीयांना शासनाकडून १ लाख १२ हजार रुपये इतकी आर्थिक मदत मंजूर करून देण्यात आली आहे. आज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या मदतीचा धनादेश नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis