मुंबईतील जोगेश्वरीत टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
मुंबई, 04 जुलै (हिं.स.)। मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हिट अँड रन अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून प
Accident


मुंबई, 04 जुलै (हिं.स.)। मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हिट अँड रन अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत टँकरचा पाठलाग करून चालकाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

मृत तरुणाचे नाव हर्ष असे असून तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेतील अमृत नगर परिसरातील अजित ग्लास गार्डन गेटसमोर घडला. हर्ष आपल्या दुचाकीवरून जात असताना भरधाव टँकरने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हर्षचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी धाडस दाखवत टँकरचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या दाव्यानुसार, टँकर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अपघातग्रस्त दुचाकी आणि टँकर दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची तपासणी सुरू आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये मद्यप्राशन झाले होते का, याचा अहवालही तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande