
परभणी, 04 जुलै (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील मानधानी गावात कथित अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी जिंतूर पोलीस ठाण्यात धडक दिली. पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांची भेट घेऊन गावातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानधानी गावात भोगाव येथील एक युवक कथितपणे अवैधरीत्या दारू आणून विक्री करत आहे. यामुळे गावातील काही अल्पवयीन युवक तसेच अनेक नागरिक दारूच्या आहारी जात असून, नशेमुळे महिलांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे सांगत अनेक महिला एकत्र येऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्या. पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या दालनात त्यांनी आपली व्यथा मांडत संबंधित अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याची मागणी केली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून गाव दारूमुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी महिलांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, अवैध दारूविक्री त्वरित थांबवण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी नमूद केले. महिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर महिलांनी समाधान व्यक्त करत परतीचा मार्ग धरला.
दरम्यान, मानधानी गावातील अवैध दारूविक्रीच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis