दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, 04 जुलै (हिं.स.) “शासन दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र केवळ शासनानेच नव्हे, तर समाजातील सेवाभावी संस्था, उद्योग आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला पाहिजे. दिव्यांगांची सेवा
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव, 04 जुलै (हिं.स.) “शासन दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र केवळ शासनानेच नव्हे, तर समाजातील सेवाभावी संस्था, उद्योग आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला पाहिजे. दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास हेच सर्वात मोठे समाधान आहे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, “प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी हा समाजाची अमूल्य संपत्ती आहे. योग्य संधी, आधुनिक साधने आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात अशी अनेक प्रेरणादायी उदाहरणे समाजात आहेत. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर समानतेच्या, सन्मानाच्या आणि विश्वासाच्या भावनेने पाहण्याची गरज आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील ३८ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, सी.पी. व्हीलचेअर, डिजिटल श्रवणयंत्रे, टीएलएम किट, रोलॅटर, वॉकिंग स्टिक तसेच इतर सहाय्यभूत साहित्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय १५ मतिमंद विद्यार्थ्यांना विशेष एमआर किटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande