मतदारांची नावे डिलीट करणाऱ्यांवर एफआयआर; षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही – यशोमती ठाकूर
अमरावती, 04 जुलै (हिं.स.) मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी मतदारांची नावे डिलीट करण्यासाठी अर्ज भरले, त्यांची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळताच संबंध
मतदारांची नावे डिलीट करणाऱ्यांवर एफआयआर; षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही – यशोमती ठाकूरांचा इशारा


अमरावती, 04 जुलै (हिं.स.) मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी मतदारांची नावे डिलीट करण्यासाठी अर्ज भरले, त्यांची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळताच संबंधितांविरोधात एफआयआर दाखल केला जाईल, असा इशारा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत दिला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे बूथ प्रमुखांना एसआयआर संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले.अमरावतीतील काँग्रेस भवन येथे आयोजित बूथ प्रमुखांच्या एसआयआर प्रशिक्षण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी मतदार यादीतील नावे वगळण्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाकडून ज्यांनी मतदारांची नावे कमी करण्यासाठी अर्ज दाखल केले, त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत एफआयआर दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यापूर्वीही एसआयआर प्रक्रिया झाली होती. मात्र त्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. आता मात्र अवघ्या दोन-तीन महिन्यांत ही प्रक्रिया राबवून मोठा घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडून नियोजनबद्ध पद्धतीने मतदारांची नावे कमी करून निवडणुकीवर परिणाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.ठाकूर म्हणाल्या, प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करणे ही स्वतःची जबाबदारी आहे. नाव नसल्यास तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ते पुन्हा समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.तिवसा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल सात हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत, या नावांसाठी अर्ज कोणी भरले, ते कोणी मंजूर केले आणि ही प्रक्रिया कोणी राबवली, याची माहिती समोर आल्यानंतर संबंधितांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी ओळखणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, हरकती आणि दुरुस्त्यांची प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे यासाठी काँग्रेसच्या सर्व बूथ प्रमुखांना एसआयआरचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. मतदारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस प्रत्येक स्तरावर लढा देणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande