पशुवैद्यक महाविद्यालयात कुक्कुटपालन विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण संपन्न
परभणी, 04 जुलै (हिं.स.)। येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासन पुरस्कृत व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला प्राप्त झालेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कं
पशुवैद्यक महाविद्यालयात कुक्कुटपालन विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण संपन्न


परभणी, 04 जुलै (हिं.स.)।

येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासन पुरस्कृत व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला प्राप्त झालेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योजकीय कौशल्यवृद्धीसाठी कुक्कुटपालन या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कुक्कुटपालन शास्त्र विभागामार्फत 29 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे डॉ. माणिक धुमाळ यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या प्रशिक्षणात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांशी संबंधित एकूण 20 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान महाविद्यालयातील विविध तज्ज्ञांनी कुक्कुटपालन व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन, मूल्यसाखळी विकास, उद्योजकता विकास तसेच शाश्वत उत्पादनवाढ यासंदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांची उद्योजकीय क्षमता वाढविणे आणि ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीस चालना देणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षणार्थींना पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागामध्ये उपलब्ध असलेल्या स्वयंचलित स्वच्छ कुक्कुट व बकरी कत्तलखाना तसेच कुक्कुट व मांस प्रक्रिया केंद्रास भेट देण्यात आली. याशिवाय असोला येथील कृषी विश्व शेतकरी उत्पादक कंपनीच्या अंडी उबवणी केंद्राची अभ्यासभेटही आयोजित करण्यात आली.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीनिवास कारले उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण समन्वयक आणि सहसमन्वयक यांच्या हस्ते आधुनिक कुक्कुटपालन या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटी डॉ. प्राणेश येवतीकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande