
पुणे, 04 जुलै (हिं.स.)संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी व्यापक नियोजन केले आहे. पावसाळ्याचा विचार करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी सहा जर्मन हँगर मांडव आणि १९५ पत्र्यांचे मांडव उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत विविध विभागप्रमुखांची बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.यंदा महापालिकेतर्फे ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे दस्तावेजीकरण केले जाणार आहे.पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पुणे शहरात दाखल होणार असल्याने त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. या अनुषंगाने विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु