ग्रँड चेस टूर : आर. प्रज्ञानानंद सलग तीन विजयांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी
नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.) भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने ग्रँड चेस टूरच्या क्रोएशियन लेगच्या रॅपिड विभागाच्या अंतिम दिवशी शानदार कामगिरी केली. त्याने अंतिम दिवशी सलग तीन सामने जिंकून फ्रान्सच्या फिरौजा अलीरेझासोबत एकूण १२ गुणांसह संयुक्तप
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद


नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.) भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने ग्रँड चेस टूरच्या क्रोएशियन लेगच्या रॅपिड विभागाच्या अंतिम दिवशी शानदार कामगिरी केली. त्याने अंतिम दिवशी सलग तीन सामने जिंकून फ्रान्सच्या फिरौजा अलीरेझासोबत एकूण १२ गुणांसह संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर प्रज्ञानानंद थोडा मागे होता, पण त्याने आपला सर्वोत्तम खेळ शेवटच्या तीन फेऱ्यांसाठी राखून ठेवला होता. त्याने क्रोएशियाच्या इव्हान सारिक, रोमानियाच्या डेक बोगदान-डॅनियल आणि नेदरलँड्सच्या अनिश गिरी यांचा पराभव करून अलीरेझाच्या आघाडीची बरोबरी केली.

फ्रान्सचा मॅक्सिम वाशियर-लाग्रेव्ह आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह यांनीही स्पर्धेच्या रॅपिड विभागात चांगली कामगिरी केली. हे दोन्ही बुद्धिबळपटू सध्या ११ गुणांसह अव्वल स्थानी असलेल्या दोन बुद्धिबळपटूंच्या अगदी जवळ आहेत. दरम्यान, भारताचा विश्वविजेता डी. गुकेश आणि जर्मनीचा व्हिन्सेंट केमर हे देखील प्रत्येकी १० गुणांसह त्याच्या अगदी मागे आहेत.

ब्लिट्झ विभागात अजून १८ फेऱ्या बाकी आहेत. सध्या, अनिश गिरी आठ गुणांवर असून, तो नेदरलँड्सच्या डीक बोगदान-डॅनियल आणि जॉर्डन व्हॅन फोरिस्ट यांच्यापेक्षा पूर्ण एक गुणाने पुढे आहे. याउलट, इव्हान सारिककडे फक्त दोन गुण असून तो गुणतालिकेत तळाशी आहे.

प्रज्ञानानंदसाठी दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली. स्पर्धेत संघर्ष करत असलेल्या इव्हान सारिकविरुद्ध, या भारतीय बुद्धिबळपटूने सुरुवातीच्या चालींपासूनच स्वतःला एका मजबूत स्थितीत आणले. प्रज्ञानानंदच्या कॅरो-कॅन डिफेन्समुळे त्याला सुरुवातीपासूनच एक सक्रिय स्थिती मिळाली. त्याचे विजयात रूपांतर करण्यास बराच वेळ लागला असला तरी, प्रज्ञानानंदने खेळावर पूर्ण नियंत्रण ठेवले. दुसऱ्या गेममध्ये, प्रज्ञानानंदने पेट्रॉफ डिफेन्सचा वापर करून डेक बोगदान-डॅनियलचा बचाव पूर्णपणे मोडून काढला आणि १५ व्या चालीपर्यंत सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता.

दिवसाच्या अंतिम सामन्यात, प्रज्ञानानंदने सर्वसाधारणपणे मजबूत मानल्या जाणाऱ्या अनिश गिरीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. त्याने कॅटलान ओपनिंगचा वापर केला आणि नंतर उत्कृष्ट डावपेचांचे प्रदर्शन करत कौशल्याने सामना संपवला. हा सामना केवळ ३४ चालींमध्ये संपला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande