अमरावतीत एसजीएमच्या डिजिटल जाळ्यात अडकले शेकडो नागरिक
अमरावती, 04 जुलै (हिं.स.)| ‘दररोज तीन टक्के परतावा’, ‘घरबसल्या हजारो रुपयांची कमाई‘ आणि ‘ई-सायकल, ई-स्कूटर भाडे व्यवसायातून निश्चित उत्पन्न’ अशी आकर्षक स्वप्ने दाखवत ‘स्मार्ट ग्रीन मोबिलिटी लिमिटेड (एसजीएम)’ या नावाने ऑनलाइन योजना सुरू होती. या योज
अमरावतीत एसजीएमच्या डिजिटल जाळ्यात अडकले शेकडो नागरिक


अमरावती, 04 जुलै (हिं.स.)| ‘दररोज तीन टक्के परतावा’, ‘घरबसल्या हजारो रुपयांची कमाई‘ आणि ‘ई-सायकल, ई-स्कूटर भाडे व्यवसायातून निश्चित उत्पन्न’ अशी आकर्षक स्वप्ने दाखवत ‘स्मार्ट ग्रीन मोबिलिटी लिमिटेड (एसजीएम)’ या नावाने ऑनलाइन योजना सुरू होती. या योजनेत महागाव तालुक्यासह परिसरातील शेकडो नागरिक अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव शहरासह तालुक्यातील आमणी, कलगाव, आंबोडा, वाघनाथ, काळी टेंभी आदी गावांमध्ये ‘एसजीएम’ कंपनीचे जाळे वेगाने पसरले होते. त्यानंतर आर्णी, उमरखेड, किनवट, माहूर आणि हिमायतनगरपर्यंत या योजनेचा विस्तार झाला. कंपनी स्वतःला अमेरिकेशी संबंधित असल्याचे सांगत होती. गुगलवर उपलब्ध माहितीचा हवाला देत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, संपूर्ण व्यवहार हा केवळ मोबाईल ॲप आणि व्हॉट्ससॲप ग्रुपपुरताच मर्यादित होता. कोणतेही कार्यालय, अधिकृत प्रतिनिधी, प्रत्यक्ष भेटीगाठी नव्हत्या. कंपनीने व्हीआयपी एक ते सहा, असे विविध गुंतवणूक स्तर तयार केले होते. व्हीआयपी एकमध्ये एक हजार ९८० रुपये, दोनमध्ये सहा १२० रुपये, तीनमध्ये १९ हजार ४८८ रुपये, तर चारमध्ये ६७ हजार २०० रुपये गुंतविण्याची योजना होती. प्रत्येक स्तरावर दररोज तीन टक्के परतावा मिळेल, असा दावा केला होता.

एवढेच नव्हे तर अधिकाधिक सदस्य जोडणार्यांना अतिरिक्त बोनस आणि कमिशनचे आमिषही दाखविण्यात आले. त्यामुळे अनेकांनी आपल्या नातेवाईक, मित्र आणि परिचितांना सहभागी करून घेतले. सुरवातीच्या काही आठवड्यात कंपनीने काही सदस्यांना नियमित परतावा दिला. लोकांचा विश्वास अधिकच दृढ झाला. ‘पैसे मिळत आहेत‘ ही चर्चा गावागावात पसरताच सदस्यसंख्या झपाट्याने वाढली. महागाव तालुक्यातच सुमारे ५०० हून अधिक नागरिकांनी केवळ व्हीआयपी चार योजनेत सहभाग घेतल्याचा दावा केला जात आहे. इतर स्तरांतील गुंतवणूकदार धरल्यास सहभागींची संख्या यापेक्षा अधिक असल्याची शक्यता आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक कंपनीचे मोबाईल ॲप बंद पडले. सदस्यांची लॉगिन खाती निष्क्रिय झाली. गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

महागाव येथील समाधान कावळे यांनी या प्रकरणात स्वतःची फसवणूक झाल्याचा आरोप करीत राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार ॲपशी संबंधित त्यांच्या खात्यांमध्ये संशयास्पद हालचाली झाल्या असून, आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे. सायबर यंत्रणेने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण व्यवहारात कुठेही प्रत्यक्ष कार्यालय, अधिकृत एजंट, कागदपत्रांची देवाणघेवाण नव्हती. त्यामुळे कंपनीचे खरे संचालक कोण, त्यांचे कार्यालय कुठे आहे आणि निधी नेमका कुठे गेला, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

दोन कोटीचा व्यवहार असल्याचा संशय अवघ्या पाच महिन्यांत व्हॉट्सॲप ग्रुप, रेफरल लिंक आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून उभारलेल्या या डिजिटल जाळ्यात महागावसह आर्णी, उमरखेड, किनवट, माहूर आणि हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविल्याचा दावा केला आहे. आता कंपनीचे ॲप अचानक बंद पडल्याने सदस्यांची खाती ब्लॉक झाली. आणि व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने अंदाजे दोन कोटी रुपयांची गुंतवणूक अडकल्याचा दावा करण्यात येत असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande