'हुतूतू' बियाण्याचा फटका? मोर्शीत सोयाबीन उगवलंच नाही; संतप्त शेतकरी आक्रमक
अमरावती, 04 जुलै (हिं.स.)। मोर्शी तालुक्यासह परिसरात बुस्टर कंपनीच्या ''हुतूतू'' सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पेरणीनंतर दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवणच झाली नसल
'हुतूतू' बियाण्याचा फटका? मोर्शीत सोयाबीन उगवलंच नाही; संतप्त शेतकरी आक्रमक


अमरावती, 04 जुलै (हिं.स.)।

मोर्शी तालुक्यासह परिसरात बुस्टर कंपनीच्या 'हुतूतू' सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पेरणीनंतर दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवणच झाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाची परिस्थिती अनुकूल असतानाही बियाणे उगवले नसल्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बियाणे, मशागत, मजुरी आणि खतांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी करत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून बियाण्यांची गुणवत्ता तपासावी, दोषी आढळल्यास कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.जर शासन आणि कृषी विभागाने त्वरित दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande