


रायगड, 04 जुलै (हिं.स.)। : कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या वाहतुकीची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या नव्या श्रीराम पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या पुलामुळे परिसरातील हजारो नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे, आमदार महेंद्र थोरवे तसेच आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास हा शासनाचा प्राधान्यक्रम असून, रस्ते आणि पूल उभारणीमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीचा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. श्रीराम पुलाच्या उभारणीमुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्या पुलामुळे पावसाळ्यातील वाहतुकीच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना पर्यायी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे. पुलाच्या लोकार्पणानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, हा पूल मतदारसंघाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)