लातूर : खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कारवाईचे संकेत
लातूर, 04 जुलै (हिं.स.)। खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कारवाईचे संकेत: गट विकास अधिकाऱ्यांनी घेतली निवेदनाची दखल शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २००९ चे उल्लंघन करून खाजगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकांविरुद्ध आता प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या
निवेदनाची दखल


लातूर, 04 जुलै (हिं.स.)। खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कारवाईचे संकेत: गट विकास अधिकाऱ्यांनी घेतली निवेदनाची दखल

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २००९ चे उल्लंघन करून खाजगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकांविरुद्ध आता प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. 'कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र'च्या अहमदपूर शाखेने केलेल्या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी व कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

अहमदपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रा. आर. पी. भोंग यांनी काही दिवसांपूर्वी निवेदन सादर करून शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाजगी शिकवणी वर्गांकडे लक्ष वेधले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंकज शेळके यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, आरटीई कायदा २००९ मधील कलम २८ नुसार शासकीय शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास मनाई आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना अशा प्रकारची नियमबाह्य कृती त्वरित थांबवण्याचे निर्देश द्यावेत, असे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

गट विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतल्यामुळे शिक्षक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून तिचा अहवाल कार्यालयास सादर करावा, तसेच या कार्यवाहीबाबत तक्रारदारालाही अवगत करावे, अशा सूचनाही गट विकास अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यामुळे आता संबंधित शिक्षकांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande