पालखी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्याने भाविक संतप्त
पुणे, 04 जुलै (हिं.स.)। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना आळंदीतील इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातून नदीत सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे सलग दुसऱ
fgdf


पुणे, 04 जुलै (हिं.स.)।

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना आळंदीतील इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातून नदीत सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी नदीपात्रावर पांढऱ्या फेसाचे थर साचल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी, तळवडे आणि चिखली परिसरातील काही औद्योगिक आस्थापनांमधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप आहे. तसेच मावळ तालुक्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे सांडपाणीही नदीत मिसळत असल्याने प्रदूषणात अधिक भर पडत आहे. नदीपात्रात कापसासारखा पांढरा फेस तरंगत असून, दुर्गंधीयुक्त पाण्यातच भाविकांना स्नान करावे लागत आहे. या प्रदूषणाचा परिणाम आळंदीसह चऱ्होली, धानोरे, गोलेगाव आणि मरकळ परिसरातील शेतीवरही होत असल्याचे सांगितले जात आहे.

बीड येथील भाविक रामा दराडे यांनी इंद्रायणी नदीची स्वच्छता गंगेच्या धर्तीवर करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी बांधकाम व्यावसायिक आणि काही कारखानदारांकडून मोठ्या पाइपद्वारे मैलामिश्रित पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप केला.

आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून मुद्दाम जलपर्णी आणि सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करत, या गंभीर प्रकाराची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande