कुंभारीत एमआयडीसी उभारणीला वेग; सिंचन पुनर्स्थापनेसाठी २४ कोटी मंजूर
सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे प्रस्तावित नवीन औद्योगिक वसाहतीला (एमआयडीसी) उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. सुमारे २,३९३ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार असून, सिंचन सुविधांच्या पुनर्स
MIDC


सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे प्रस्तावित नवीन औद्योगिक वसाहतीला (एमआयडीसी) उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. सुमारे २,३९३ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार असून, सिंचन सुविधांच्या पुनर्स्थापनेसाठी जलसंपदा विभागाला २४ कोटी रुपयांचा निधी देण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप आणि कुंभारी येथे नवीन एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे होता. मात्र, उच्चाधिकार समितीने सध्या केवळ कुंभारी येथील प्रस्तावाला मंजुरी दिली असून, मंद्रूपचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. प्रस्तावित एमआयडीसीचे क्षेत्र होटगी लाभ वितरिका सिंचन क्षेत्रात येत असल्याने तेथील विद्यमान सिंचन सुविधांची पुनर्स्थापना करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा २४ कोटी रुपयांचा खर्च उद्योग विभागाकडून जलसंपदा विभागाला देण्यात येणार आहे. सिंचन कामांच्या पुनर्स्थापनेनंतर संबंधित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल आणि त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल.

पुढील टप्प्यात जमीन धारकांना नोटिस बजावून उद्योग विभागाचे अधिकारी त्यांच्याशी वाटाघाटी करतील. परस्पर संमतीने मोबदला निश्चित झाल्यानंतर भूसंपादनाचा अंतिम निवाडा जाहीर करून एमआयडीसीकडून जमिनींचा ताबा घेण्यात येईल.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंजुरीपासून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. हा प्रकल्प साकार झाल्यानंतर दक्षिण सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande